अल्प परिचय

शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये विभागप्रमुख पदावर कार्यरत असणाऱ्या डॉ केशव यशवंत राजपुरे यांचा जन्म २४ जुलै १९७१ रोजी सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील बावधन जवळच्या अनपटवाडी येथे झाला. शाळेपासून वर्गातील प्रथम क्रमांक टिकवत त्यांनी लोणंदच्या शरदचंद्र पवार महाविद्यालयातून बीएस्सी फिजिक्स ही पदवी शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांकाने १९९२ साली मिळवली.त्यासाठी त्यांना प्रा शिर्के पुरस्कार, वारंगे पारितोषिक व स्वामी शिष्यवृत्ती मिळाली. हीच गुणवत्ता टिकवत १९९४ साली ते एमएस्सी फिजिक्स प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यासाठी त्यांना कुलकर्णी जांभळीकर पुरस्कार मिळाला.

अशा दैदिप्यमान शैक्षणिक कारकीर्द असणाऱ्या सरांना नोकरी ऐवजी संशोधनाची भुरळ पडली नसती तर नवलच. जुनिअर व सिनियर रिसर्च फेलोशिप द्वारे त्यांनी प्रा चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलर सेल क्षेत्रात आपले संशोधन पूर्ण करून २००० साली पिएचडी पदवी संपादन केली. त्यांच्या संशोधनाचा गौरव पुण्याच्या महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्स तर्फे करण्यात आला. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. कोल्हापुरात कार्यरत राहून त्यांनी आपले संशोधन पुढे चालूच ठेवले. थीन फिल्म्स, सोलर सेल्स, ट्रान्स्परन्ट कंडकक्टिव्ह ऑक्साईड, फोटोइलेक्ट्रोकेमिस्ट्री, गॅस सेन्सर, पाणी शुद्धीकरण हे सरांचे आवडीचे विषय.

या संशोधनासंदर्भात सरांचे आजपर्यंत २०० शोधिनबंध विविध आंतरराष्ट्रीय नियतकालीकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यासाठी त्यांना ८७८३ सायटेशंस मिळाली आहेत. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत / सेमिनारमध्ये त्यांचे सुमारे १५० शोधिनबंध सादरीकरणे झाली आहेत. एम.एस्सी. च्या ७५ पेक्षा जास्त प्रोजेक्ट्सना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. आजपर्यंत ३८ राष्ट्रीय व २५ आतंरराष्ट्रीय परिषदांमधील सहभागासह दोन परिषदांचे आयोजन सरांनी केले आहे. केंद्र सरकारचे जवळ जवळ ९० लाख रुपयांचे अनुदान मिळवून ५ संशोधन प्रकल्प सरांनी पूर्ण केले आहेत. पाणी शुद्धीकरणावरील दोन पेटंट सरांच्या नावे आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत १५ जणांनी पिएचडी पूर्ण केली आहे तर सध्या ७ जन काम करत आहेत. यानिमित्ताने विद्यापीठात विविध संशोधन सुविधांची निर्मितीत सरांनी त्यांचा सहभाग राहिला आहे. विभागातील पिआयएफसी (फिजिक्स इंस्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी सेन्टर) हे त्याचेच उदाहरण आहे. त्याच बरोबर त्यांनी विद्यापीठाच्या युसिक (युनिव्हर्सिटी सायन्स इंस्ट्रुमेंटेशन सेन्टर)) व सीएफसी (कॉमन फॅसिलिटी सेन्टर) विभागांचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पडली आहे. तसेच त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या सोफ्टिस्टिक एनालिटिकल इन्स्ट्रुमेंट सुविधा (एसएआयएफ) केंद्राचे समन्वयक म्हणून काम पहिले आहे आणि सध्या ते शिवाजी विद्यापीठ (विज्ञान आणि तंत्रज्ञान) जर्नलचे व्यवस्थापकीय संपादक म्हणून काम करतात.

ते शिवाजी विद्यापीठ, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर आणि डीकेटीई संस्थान, इचलकरंजी च्या अभ्यास मंडळांचे सदस्य आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधन आणि मान्यता समितीचे ते सदस्य आहेत. ते स्थानिक चौकशी समिती (संलग्नता), विद्यापीठाची तांत्रिक समिती आणि खरेदी समितीचे सदस्य आहेत. ते शिक्षक आणि प्राचार्यांच्या निवड समित्यांसाठी कुलगुरूचे नामनिर्देशित सदस्य आहेत. त्यांची ५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सर अनेक विद्यापीठांच्या पीएचडी साठीचे रेफरी म्हणून काम पाहत आहेत.

मराठी विज्ञान परिषद, मटेरीयल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया (एमआरएसआय), सेमीकंडकटर सोसायटी ऑफ इंडिया (एसएसआय), इंडियन फिजिक्स असोसिएशन (आयपीए), इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स (आयएपीटी) या संस्थांचे आजीव सभासद आहेत. विविध संशोधन पत्रिकांच्या संपादक मंडळावरसुद्धा सर काम करतात. १९९२ साली शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाचे ते सदस्य होते.

एव्ह्ढी गुणवत्ता व पदे असूनही सरांना काडीचाही अहंकार नाही. पाय जमिनीवर ठेवूनच सामाजिक कामातही अग्रेसर आहेत. ग्रामविकास मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या बहुतांश कार्यक्रमास ते आवर्जून उपस्थित राहतात आणि हिरीरीने सहभागी होतात. वेळोवेळी मार्गदर्शन करतात. हे सगळं करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे ती त्यांच्या तंदुरुस्त अशा उत्तम शरीर संपत्तीमुळे ! त्यासाठी नियमितपणे ते व्यायाम करत असतात. आपले दाजी, बंधू, नातेवाईक व शिक्षकांनी वेळोवेळी दिलेल्या आधार, प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाबद्दल ते नेहमी कृतज्ञतेचा भाव जपतात.